कन्हैय्याच्या निमित्ताने,वांझोटा संशय कल्लोळ !
कन्हैय्या कुमारच्या मुंबई व पुणे येथील सभेनंतर पारंपारीक मार्क्सवाद्यांनी कन्हैय्या कुमार याची संभावना बुर्ज्वा राजकारण करणारा निळा कॉम्रेड म्हणून केली आहे,तर आंबेडकरवाद्यांनी कन्हैय्या कुमारला जयभिम - लाल सलाम म्हणणारा, आंबेडकरी चळवळ पोखरण्यास निघालेला लाल भाई कम्युनिष्ट म्हणून त्याच्याबद्दल साशंकता व्यक्त केली आहे. कन्हैय्या कुमारच्या बाबतीत तो मार्क्सवादी की आंबेडकरवादी हा संभ्रम जाणून बुजून निर्माण करण्यात येत आहे असा संशय घेण्यास वाव आहे. या गोंधळात कन्हैय्या कुमार व त्याचे सहकारी ज्या कारणासाठी लढा देण्याची भाषा करीत आहेत, जे मुद्दे उपस्थित करीत आहेत ते मुद्दे दुर्लक्षित होत आहेत.
कन्हैय्या कुमार याच्या नेतृत्वाचा उदय हैद्राबाद विद्यापिठातील पीएचडी करणारा विद्यार्थी रोहीत वेमुला याच्या संस्थात्मक हत्येच्या विरोधात उसळलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर झाला आहे. रोहीत वेमुला याच्या संस्थात्मक हत्येमुळे उच्च शिक्षण संस्थांमधील जातीय भेदभावाचा मुद्दा ठळकपणे ऐरणीवर आला. याविरोधात देशभरातील अनेक विद्यापिठामध्ये शिकत असलेल्या विद्यार्थांनी प्रखर आंदोलन उभारले. अशा संस्थांमधील उच्च जातीय प्राध्यापक व उच्च पदस्थ अधिकाऱयाकडून होणाऱया जातीय भेदभावाला आळा घालण्यासाठी रोहीत ऍक्ट पारित करण्याची मागणी करण्यात आली. दिल्लीच्या जवाहरलाल नेहरु विद्यापिठातील विद्यार्थ्यांनी हे आंदोलन अत्यंत नेटाने आणि प्रखरपणे चालविले. यामुळे बचावात्मक पातळीवर गेलेल्या केंद सरकारने अत्यंत तकलादू आरोप लावून कन्हैय्या कुमार व त्याच्या इतर सहकाऱयांना देशद्रोहाच्या आरोपाखाली तुरंगात टाकले. यामुळे विद्यार्थ्यांचे हे आंदोलन घटनात्मक मुल्ये पायदळी तुडवून हुकुमशाही पध्दतीने कारभार करणारे सरकार व त्या विरोधात घटनात्मक हक्कांचा आग्रह धरणारे विद्यार्थी, या विद्यार्थ्यांचे समर्थक सामान्य नागरिक व संवैधानिक मुल्यांवर निष्ठा ठेवणारे बुध्दीजीवी या दोन छावण्यामध्ये केंद्रीत झाले आहे. हा संघर्ष डावे मार्क्सवादी विरुध्द उजवे ब्राह्मणवादी या अक्षावर स्थिरावलेला नसून भारतीय राज्य घटना, लोकशाही , नागरिकांचे कायदेशीर व मुलभूत मानवी अधिकार यांचा आग्रह धरणारी जनता विरुध्द या सर्व बाबींना विरोध करणारे सत्ताधारी व सत्ताधाऱयांचे समर्थक लोक या अक्षावर केंद्रीत झाला आहे. या संघर्षामध्ये प्रसार माध्यमांचा फोकस जरी कन्हैय्या कुमार या विद्यार्थी नेत्यावर असला तरी, या आंदोलनाचा एकमेव निर्विवाद नेता म्हणून कन्हैय्या कुमारला किंवा त्याच्या विद्यार्थी संघटनेचे केंद्रीय नेतृत्व असलेल्या कम्युनिष्ट नेत्यांना मान्यता मिळालेली नाही. हा संघर्ष म्हणजे देशातील सामाजिक,सांस्कृतिक व राजकीय जीवनाचे ब्राह्मणी मूल्यांच्या आधारे नियंत्रण करू पाहणारा रा.स्व.संघ,संघाची राजकीय आघाडी असलेला सत्ताधारी भाजप, ब्राह्मणवादाच्या विरोधात निर्णायक भूमिका न घेणारे कॉंग्रेससारखे राजकीय पक्ष यांच्या विरोधात उभे राहिलेले हे एकप्रकारचे जनआंदोलन आहे. या जनआंदोलनात मूलतत्ववादी ब्राह्मणवाद व या विचाराचे पतिनिधीत्व करणाऱया रा.स्व. संघ व अन्य पिलावळ संघटना, सत्ताधारी भारतीय जनता पक्ष, ब्राह्मणवादाच्या घातक परिणामाकडे डोळेझाक करीत निव्वळ राजकारण करणारे कॉंग्रेस व इतर प्रादेशिक राजकीय पक्ष यांच्या विरोधात असलेल्या आंबेडकरवादी संघटना व गट, माकप, भाकप, माकप (लेनीनवादी) पक्षाशी संलग्न असलेल्या विद्यार्थ्यांच्या , कामगारांच्या, महिलांच्या, युवकांच्या अशा अनेकविध संघटना आणि कोणत्याही राजकीय पक्षाशी उघड बांधिलकी न दाखविणाऱ्या फुटकळ संघटना सहभागी झाल्या आहेत. या सर्व संघर्षरत संघटनांवर कम्युनिष्ट असा ठप्पा मारुन या जनआंदोलनापासून दुर राहणे म्हणजे एकप्रकारे मुलतत्ववादी ब्राह्मणवादाला बळ देणे होय.
सुरुवातीच्या काळात केवळ रोहीत वेमुला याच्या संस्थात्मक हत्येस जबाबदार असलेल्या दोषींविरुध्द कारवाई करण्यासाठी सुरु झालेले हे विद्यार्थ्यांचे आंदोलन आता देशातील मुलभूत समस्यांच्या सोडवणूकीसाठी संघर्ष करणारे सर्वसमावेशक जनआंदोलन बनले आहे. विद्यापिठातील जातीय भेदभाव नष्ट करण्यासाठी सुरु झालेले हे आंदोलन केवळ आंबेडकरवादी विद्यार्थ्यांच्या ताकदीवर सुरु ठेवण्या इतकी आंबेडकरी विद्यार्थी संघटनांची ताकद नाही. आंबेडकरवादी विद्यार्थी संघटनांना बळ देण्यासाठी पालकाची भूमिका बजावणारे प्रबळ आंबेडकरवादी राजकीय पक्ष कोणत्याही राज्यात अस्तित्वात नाहीत.स्वतःला आंबेडकरवादी पक्ष म्हणवून घेणाऱ्या ज्या काही लहानमोठ्या टोळ्या गलीमोहल्यात कार्यरत आहेत त्यांच्यामध्ये एकमेकांविषयी प्रचंड दुरावा,असूया,द्वेष आणि शत्रुत्वाची भावना ठासून भरली आहे. यामुळे सहाजिकच या आंदोलनामध्ये प्रस्थापित राजकीय नेतृत्वाला टाळून फुले - आंबेडकरवादी,मार्क्सवादी, माओवादी, समाजवादी तसेच काश्मिरी अस्मितावादी विद्यार्थ्यांच्या लहान मोठ्या संघटना, प्रचलित राजकारणी नेत्यांविषयी तिटकारा असणाऱ्या युवकांच्या संघटना एकत्रित झाल्याचे दिसून येते. या संघटनांनी आपले मूळ मुद्दे बाजुला ठेवून देशातील ब्राह्मणवाद व जातीवाद नष्ट करण्याचा मुद्दा केंद्रस्थानी आणला आहे.मुंबईतील सभेचे उदाहरण पाहिल्यास या सभा पारंपारिक मार्क्सवादाच्या पठडीतील नाहीत हे स्पष्ट होईल. या सभांमध्ये उपस्थित नेते तसेच बहुतांश श्रोते डाव्या मार्क्सवादी- समाजवादी चळवळीशी संबंधीत होते. तरीही सभेतील वक्त्यांच्या भाषणांचा सूर फुले - आंबेडकरी चळवळीशी नाते सांगणारा होता. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारावर आधारीत समाज निर्माण करण्याचा होता. श्रोत्यांमधून देण्यात येणाऱया घोषणा नेहमीच्या मार्क्सवादी आंदोलनात देण्यात येणाऱया घोषणांपेक्षा वेगळ्या होत्या. एखाद दुसरा अपवाद वगळता कोणत्याही वक्त्याने मार्क्स, लेनीन,माओ या नेत्यांचे नाव घेतले नाही. अथवा त्यांच्या विचारांची आवश्यकता व्यक्त केली नाही. प्रत्येक विद्यार्थी वक्त्याचा भर आंबेडकरवादी चळवळ आणि डावी चळवळ तसेच ब्राह्मणवादी विचारांचा विरोध करणाऱया अन्य छोट्या मोठ्या संघटना व गट एकत्र याव्यात यावर होता. या एकत्रित आघाडीने जनआंदोलनाच्या माध्यमातून हिंदूराष्ट्रवाद, रा.स्व.संघाचा दहशतवाद, सत्ताधाऱयांची जनविरोधी निती, ब्राह्मणवाद, जातीवाद याविरुध्द व्यापक लढा उभारला पाहिजे, नविन पर्याय निर्माण केले पाहीजेत यावर विद्यार्थी नेत्यांनी भर दिला. कन्हैय्या कुमार यांनी आपल्या भाषणात कम्युनिझम, कम्युनिष्ट अर्थशास्त्र, फॅसिझम, वर्गसंघर्ष इत्यांदीचा उल्लेखही केला नाही. संपुर्ण भाषणात त्याने मार्क्सचा उल्लेख फक्त एक वेळा तो सुध्दा इतर सर्व नेत्यांची नावे घेताना अनुषंगाने केला. हे पाहिले तर कन्हैय्या कुमार व त्याच्या सहकारी विद्यार्थी नेत्यांवर कम्युनिष्ट असा ठप्पा मारणे घाईचे ठरेल. कन्हैय्या व त्याच्या सहकारी विद्यार्थी नेत्यांनी ज्यावर अधिकाधिक जोर दिला आहे तो ब्राह्मणवाद व जातीवाद नष्ट करण्याचा मुद्दा हा कम्युनिष्ट मुद्दा नाही. विविध विद्यापिठात शिकणाऱया नव्या दमाच्या सर्व जातीय तरुण -तरुणींनी ब्राह्मणवाद व जातीवाद नष्ट करण्यासाठी संघटीत लढा उभारण्याची भाषा करणे म्हणजे स्वातंत्र्योत्तर काळातील आतापर्यंतच्या राजकारणाला व समाजकारणाला मिळालेली सर्वात मोठी कलाटणी आहे. या जनआंदोलनातून कदाचित नव्या दमाच्या तरुण नेतृत्वाचा नविन राजकीय पर्यायसुध्दा निर्माण होवू शकतो. हा पर्याय पारंपारिक कम्युनिष्ट, पारंपारिक आंबेडकरवादी किंवा भाजपात्तर काँग्रेस व अन्य राजकीय पक्षांच्या आघाडीपेक्षा सर्वस्वी भिन्न असू शकतो. ही शक्यता विचारात घेवून कन्हैय्या कुमार शहेला रशिद, ऋचा सिंग, जोएल, दोंथा प्रशांत, उमर खलिद, रमा नागा, अनिर्बन भट्टाचार्य इत्यांदीसारख्या तरुणांच्या नेतृत्वाकडे पाहिले पाहिजे. उजव्या ब्राह्मणवादी विचारांच्या विरोधात पारंपारिक राजकारण करणारे वयोवृध्द नेते कितीही आदरणीय असले तरी त्यांनी आता या नव्या दमाच्या तरुणांना एक स्पेस उपलब्ध करुन देण्याची गरज आहे. बदललेल्या परिस्थितीत पारंपारिक मार्क्सवाद किंवा आंबेडकरवाद यांची नव्या मुल्यांशी सांगड घालून नवी रणनिती बनविण्याची आवश्यकता आहे. हे काम पारंपारिक मार्क्सवादी अथवा आंबेडकरवादी राजकीय नेत्यांच्या आवाक्याच्या बाहेरचे आहे. या स्थितीत जे तरुण ब्राह्मणवाद आणि जातीवाद या मुलभूत समस्येला समाप्त करुन संविधानावर आधारीत सामाजिक न्याय देणारे राष्ट्र मजबूत करु इच्छित असतील तर त्यांना वाट मोकळी करुन देणे हेच शहाणपणाचे होईल. कन्हैय्या विरुध्द उगीच संशय कल्लोळ माजवून काहीही साध्य होणार नाही.
No comments:
Post a Comment