Monday, September 5, 2016

' दलित ' शब्द आणि डॉ. आंबेडकरांचा दृष्टिकोन

  
Sunil Khobragade
September 5 at 12:41pm
 
' दलित ' शब्द आणि डॉ. आंबेडकरांचा दृष्टिकोन

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे अनुयायीत्व मान्य असलेल्या महाराष्ट्रातील काही लोकांनी मागील अनेक वर्षांपासून सामाजिक व आर्थिक दृष्ट्या कमकुवत आणि कनिष्ठ पातळीवर जीवन जगणाऱ्या समाज समूहाला दलित म्हणून संबोधण्यात येऊ नये यावर निरर्थक वाद चालविला आहे. अश्या वर्गाला दलित संबोधल्यामुळे आंबेडकरी चळवळीची फार मोठी हानी होणार आहे म्हणून या वर्गाला बौद्ध / नवबौध्द या धार्मिक ओळखीने ( सामाजिक व आर्थिक दृष्ट्या कमकुवत लोक बौद्ध धर्माचे अनुयायी नसले तरीही ) संबोधण्यात यावे असे काही लोकांचे म्हणणे आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना आदर्श मानणारे पण बौद्ध धर्माला प्राधान्य न देणारे काही लोक तसेच बामसेफिस्ट विचारसरणीचे लोक या वर्गाला अनुसूचित जाती / मूलनिवासी म्हणून संबोधण्यात यावे असे प्रतिपादन करतात. फारसे कार्य न करता प्रसिद्धीचा हव्यास असलेले काहीजण दलित शबदांच्या वापरावर बंदी घालण्यात यावी यासाठी न्यायालयातही गेले आहेत. बौद्ध धर्मवादी, बहुजनवादी तसेच मूलनिवासीवादी या सर्व गटांचे म्हणणे आहे की, दलित शब्द हा अपमानास्पद, तुच्छतादर्शक, हीनतादर्शक शब्द आहे. हा शब्द उच्चजातीय हिंदूंनी आपल्यावर लादला आहे. या शब्दाला बाबासाहेबांचा विरोध होता यामुळे बाबासाहेबानी आपल्या लेखनात, भाषणात,दलित शब्द कधीही वापरला नाही. दलित हा शब्द घेऊन कोणतीही संघटना स्थापन केली नाही. बाबासाहेबानी राउंड टेबल कॉन्फरन्स मध्ये सहभागी झाल्यानंतर अल्पसंख्याक कमिटीस व मतदार कमिटी समोर दलित हा शब्द वापरू नये अशा प्रकारची निवेदने दिली होती.त्यामुळे शासकीय कामकाजामध्ये वापरला जाणारा दलित शब्द वगळला गेला. त्या ऐवजी शेड्युल्ड कास्ट्स शेड्युल्ड ट्राइब्स व मागास वर्ग हे शब्द वापरण्यात आल्या. याच संज्ञा संविधानामध्ये वापरण्यात आल्या आहेत. डॉ.बाबासाहेब आंबेडकर शासकीय व संविधानिक पातळीवर दलित शब्द काढून टाकण्यात यशस्वी झाले. परंतु बाबासाहेबांच्या नावाने आंदोलन करण्यारा लोकांनी आपल्या मनातून आणि आंदोलनातून या शब्दाला हद्दपार केले नाही. उलट दलित या संकीर्ण व नीच मानसिकतेचा आज आपल्या स्वार्थासाठी वापर केला जात आहे असे बामसेफिस्ट, बहुजनवादी तसेच मूलनिवासीवादी गटांचे म्हणणे आहे .तर नीच-हलक्या जातीची पददलित विषमतावादी ओळख मिटविण्यासाठी बौद्ध धर्मात धर्मांतराशिवाय तरणोपाय नाही असे बौद्ध धर्मवादी गटांचे म्हणणे आहे.
दलित या शबदाची व्युत्पत्ती, अर्थबोध, स्वीकारार्हता, जागतिक मान्यता, वापर यासंदर्भातील संपूर्ण स्थिती स्पष्ट करणारा " बौद्ध की दलित हा नुसताच वितंडवाद " हा लेख लिहून मी यासंदर्भातील गैरसमज आणि निरर्थक भावनात्मक आवेष याचे निराकरण करण्याचा प्रयत्न केला आहे. दलित हा शब्द जाती अथवा धर्माचा निदर्शक नसून व्यक्तीच्या किंवा समूहाच्या सामाजिक आणि आर्थिक अवनत स्थितीचा व अवस्थेचा निदर्शक आहे हे या लेखातून स्पष्ट केले आहे. तसेच हा शब्द अनुसूचित जातीचा समानार्थक शब्द म्हणून वापरता येणार नाही. परंतु व्यक्तीच्या किंवा समूहाच्या सामाजिक आणि आर्थिक अवनत स्थितीचा निर्देश करण्यासाठी कोणतेही न्यायालय त्यावर बंदी घालू शकत नाही हे सुद्धा या लेखातून मी स्पष्ट केले आहे. हा लेख प्रसिद्ध झाल्यानंतर अनेक वाचकांनी मला व्यक्तिशः फोन करून, सामाजिक माध्यमातून प्रतिक्रिया देऊन मी बौद्ध धम्माचा विरोधक असल्याचे मला ऐकविले. याबरोबरच खुद्द बाबासाहेबानी दलित शब्दाचा विरोध केला असूनही मी या शब्दाचे समर्थन करून बाबासाहेबांच्या विरोधी भूमिका घेत असल्याचा आरोप लावला. काही लोकांनी आणि अभ्यासकांनी मात्र दलित शब्दाबद्दल मी केलेले विश्लेषण व या संदर्भातील माझी भूमिका योग्य असल्याचे सांगितले. मात्र बाबासाहेबानी खरोखरच दलित शब्दाचा विरोध केला होता की, बामसेफिस्ट व मूलनिवासीवाद्यांनी याबाबत खोटा प्रचार केला आहे याचे निराकरण करणारा लेख मी लिहावा अशीही विनंती केली. यामुळे दलित हा शब्द बाबासाहेबानी आपल्या लेखनात, भाषणात वापरला होता काय ? दलित हा शब्द घेऊन एखादी संघटना स्थापन केली काय ? दलित शब्दाबद्दल बाबासाहेबांनी समर्थनाची किंवा विरोधाची काही ठाम भूमिका घेतली होती काय या प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न या लेखातून करण्यात येत आहे. हा प्रयत्न केल्यामुळे मी दलित शब्दाचा, व्यक्तीने कायम दलित राहावे याचा समर्थक आहे, बौद्ध धम्माचा विरोधक आहे असा गैरसमज कृपया कोणीही करून घेऊ नये.

बाबासाहेब आणि दलित शब्दाचा वापर.

बाबासाहेबानी दलित शब्द आपल्या लेखनात, भाषणात कधीही वापरला नाही तसेच दलित नावाने कोणतीही संघटना स्थापन केली नाही असा प्रचार प्रामुख्याने बामसेफिस्ट आणि मूलनिवासीवादी सातत्याने करीत आले आहेत. यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी गोलमेज परिषदेच्या अंतर्गत मिस्टर लोथियन यांच्या अध्यक्षतेखालील मताधिकार निर्धारण समितीला दिलेल्या निवेदनाचा हवाला देतात. या निवेदनात बाबासाहेबानी अस्पृश्याना दलित या नावाने का संबोधण्यात येऊ नये याबाबत दिलेल्या कारणांची चर्चा पुढे कार्यात येईलच. तत्पूर्वी बाबासाहेबानी दलित हा शब्द आपल्या भाषणात आणि लेखनात कधीही वापरला नाही किंवा दलित शब्द समाविष्ट असलेली संघटना स्थापन केली नाही या अपप्रचाराचे निराकरण करणे आवश्यक आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या सक्रिय सार्वजनिक लढ्याची सुरुवात करण्यासाठी 20 जुलै 1924 रोजी ' बहिष्कृत हितकारिणी सभा ' या नावाची संघटना स्थापन केली. ही संघटना संस्था नोंदणी अधिनियम 1860 च्या कायद्यान्वये नोंदणीकृत करण्यात आली.या संघटनेच्या लिखित घटनेत संघटनेची ध्येय व उद्दिष्टे याखाली बहिष्कृत हितकारिणी सभा डिप्रेस्ड क्लासेस म्हणजेच दलितांच्या हितांसाठी कोणते उपक्रम हाती घेईल हे नमूद केले आहे. या पाचही उद्दिष्टात डिप्रेस्ड क्लासेस म्हणजेच दलित हा शब्द वापरण्यात आला आहे.(BAWS VOL 17/2 पृष्ठ 396 ) यानंतर सायमन कमिशनला दिलेल्या निवेदनात आणि कमिशनपुढे दिलेल्या साक्षीमध्ये डिप्रेस्ड क्लासेस म्हणजेच दलित हा शब्द वारंवार वापरला आहे. (BAWS VOL -2 ). नागपूर येथे 8-9 ऑगस्ट 1930 रोजी अखिल भारतीय दलित काँग्रेस परिषद घेण्यात आली होती. या परिषदेचे अध्यक्ष डॉ. बाबासाहेब आंबेडकर होते.अखिल भारतीय दलित काँग्रेस परिषदेच्या लिखित अध्यक्षीय भाषणात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी 1) दलित वर्गासाठी संरक्षण तरतुदी 2) दलित वर्ग आणि सायमन कमिशन 3) दलित वर्ग आणि स्वराज्य 4)दलित वर्ग आणि असहकार 5) दलित वर्गाचे संघटन 6) दलित वर्गाची उन्नती या मथळ्याखाली दलित वर्गांच्या सर्व समस्यांची व भावी लढ्याच्या योजनेची सविस्तर चर्चा केली आहे. साप्ताहिक ' जनता ' पत्राच्या 24 नोव्हेंबर 1930 रोजी प्रसिद्ध झालेल्या पहिल्या अंकात मागासवर्गीय व पददलित जनतेच्या आर्थिक राजकीय वगैरे प्रश्नांचा विचार करण्यासाठी हे पत्र प्रसिद्ध करण्यात येत असल्याचे नमूद केले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर नोव्हेंबर 1931 मध्ये इंग्लंडमध्ये गोलमेज परिषदेला हजर होते. या काळात लंडन येथील वास्तव्यात भारतातील राजेरजवाडे व संस्थानिक यांना उद्देशून दलितांच्या उन्नतीसाठी आर्थिक मदत देण्याबाबत एक अपील प्रसिद्ध केले. या अपिलात जून 1925 मध्ये डिप्रेस्ड क्लासेस इन्स्टिट्यूट नावाची संस्था आपण स्थापन केल्याचे त्यांनी नमूद केले आहे. ही संस्था दलित वर्गाच्या सदस्यांनी दलितांचा सामाजिक आणि राजकीय दर्जा उंचवावा व दलित वर्गाचे आर्थिक कल्याण करता यावे यासाठी स्थापन करण्यात आल्याचे नमूद केले आहे. (BAWS VOL 17/2 पृष्ठ 407 ) यानंतरही बाबासाहेबानी अनेक भाषणात आणि लिखित स्वरूपात दलित हा शब्द वारंवार वापरला आहे. या सर्व भाषणांचा व लेखनातील उताऱ्यांचा संदर्भ देणे विस्तारभयास्तव अश्यक्य आहे. तरीही जिज्ञासूंनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर रायटिंग अँड स्पीचेसच्या खंड 18 ( 2 ) मधील पृष्ठ 96,98,102,111-113,405,411,419,424,428 तसेच खंड 18 ( 3 ) मधील पृष्ठ 350,395,417,435 वरील भाषणे पाहावीत.

नाव '' जय भीम '' जात '' शेकाफे '' निवास '' दलितस्थान ''

काँग्रेस पक्ष, काँग्रेसचे नेते मोहनदास गांधी तसेच ब्रिटिश सरकार यांनी स्वतंत्र भारताच्या भावी राज्यघटनेत दलितांचे राजकीय हक्क सुरक्षित ठेवण्यासंदर्भात जे विश्वासघाताने धोरण अवलंबिले होते त्याविरोधात शेड्युल्ड कास्ट्स फेडरेशन तर्फे जुलै 1946 मध्ये पुणे येथील कौन्सिल हॉल च्या समोर सत्याग्रह करण्यात आला होता. या सत्याग्रहाची प्रमुख मागणी पुणे करार रद्द करा ही होती. पुढे शेड्युल्ड कास्ट्स फेडरेशनने हा सत्याग्रह देशभर सुरु केला. या सत्याग्रहींना जेव्हा पोलीस अटक करीत होते त्यावेळी त्यांना त्यांचे नाव-गाव व राहण्याचा पत्ता विचारला जाई. नागपूर येथील सत्याग्रहींनी या काळात पोलिसांना आपले नाव '' जय भीम '' जात '' शेकाफे '' राहण्याचे ठिकाण '' दलितस्थान '' अशी माहिती देण्यास सुरुवात केली.(BAWS VOL 17/2 पृष्ठ 511 ) यात " दलितस्थान " हा जो उल्लेख करण्यात येत होता यावरून त्यावेळी काँग्रेस धार्जिण्या वृत्तपत्रांनी बराच गोंधळ माजविला होता. जर बाबासाहेबांचा किंवा त्यावेळच्या शेकाफे नेत्यांचा दलित शब्दाला विरोध असता तर हा शब्द वापरण्यास बाबासाहेबानी सत्याग्रहींना विरिध केला असता. मात्र बाबासाहेबानी तास कोणताही आदेश दिला नाही हे लक्षात घेतले पाहिजे. बाबासाहेबानी आलं इंडिया शेड्युल्ड कास्ट्सचे मराठी भाषांतर अखिल भारतीय दलितवर्ग फेडरेशन असे केल्याचे फेडरेशनच्या 1951 साली प्रसिद्ध केलेल्या जाहीरनाम्यावरून दिसून येते. याच जाहीरनाम्यात डॉ. बाबासाहेबाना उद्देशून दलितांचे एकमेव पुढारी असे संबोधन वापरण्यात आले आहे. जनता साप्ताहिकात सर्वत्र आलं इंडिया शेड्युल्ड कास्ट्सचे मराठी भाषांतर अखिल भारतीय दलितवर्ग फेडरेशन असेच केले आहे. प्रबुद्ध भारतातही आलं इंडिया शेड्युल्ड कास्ट्स फेडरेशनचे मराठी भाषांतर अखिल भारतीय दलितवर्ग फेडरेशन असेच केले आहे. जर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा दलित या शब्दाला विरोध असता तर त्यांनी आपल्या हयातीत स्वतःच्या सहीने प्रसिद्ध केलेल्या शे.का.फेडरेशनच्या 1951 साली प्रसिद्ध केलेल्या जाहीरनाम्यात किंवा प्रबुद्ध भारतात दलित हा शब्द वापरला नसता.किंवा वापरण्यास मनाई केली असती. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धर्म स्वीकारानंतर बौद्धांनी यापुढे स्वतःची सामाजिक आणि राजकीय अवनत स्थिती दर्शविण्यासाठी दलित शब्द वापरू नये असा कोणताही आदेश किंवा उपदेश धर्मांतरानंतर केलेल्या भाषणामध्ये दिलेला नाही. बाबासाहेबानी नागपूर येथे 14 ऑक्टोबर 1956 रोजी बौद्ध धम्माची दीक्षा घेतल्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजेच दिनांक 15 ऑक्टोबर 1956 रोजी नागपूर महानगर पालिकेने त्यांना मानपत्र देऊन त्यांचा सन्मान केला. या मानपत्रात बाबासाहेबाना उद्देशून ' भारतीय पददलित जनतेच्या मूक भावनांची साकारमूर्ती " असा शब्द वापरला आहे. (BAWS खंड 18 पृष्ठ 530 )नागपूर महानगर पालिकेने बाबासाहेबांचा पददलित जनतेचा नेता असा उल्लेख बौद्ध धर्माच्या स्वीकारानंतर केला आहे. बौद्ध झाल्यामुळे आता अस्पृशांची सामाजिक आणि आर्थिक स्थिती दलित राहिलेली नाही असे बाबासाहेबांचे मत असते किंवा दलित किंवा पददलित या शब्दाला विरोध असता किंवा दलित / पददलित म्हणजे तुच्छ, हीन, किळसवाणे, नीच असे त्यांचे मत असते तर त्यांनी स्वतःला दलितांचे पुढारी, पददलित जनतेच्या मूक भावनांची साकारमूर्ती असे संबोधण्यास विरोध केला असता.या शब्दाचा विरोध करून यापुढे धर्मांतरित बौद्धांनी दलित हा स्थितिदर्शक शब्द वापरू नये असा आदेश दिला असता. मात्र तसे घडल्याचे दिसत नाही. बाबासाहेबानी आपल्या सार्वजनिक कार्याची सुरुवात करण्यासाठी स्थापन केलेल्या बहिष्कृत हितकारिणी सभा या पहिल्या संघटनेपासून पुढे अनेक वर्षे स्वतः अस्पृश्याना उद्देशून दलित हा शब्द वारंवार वापरला आहे. जनता, प्रबुद्ध भारत या वृत्तपत्रामधून तसेच बाबासाहेबांच्या ग्रंथातून हा शब्द वारंवार वापरला गेला आहे. हे पाहता दलित हा तुच्छ, हीन, किळसवाणे, नीच या अर्थाचा शब्द आपल्यावर उच्चं वर्णियांनी किंवा ब्राह्मणांनी मुद्दाम लादला आहे असे म्हणणे म्हणजे निव्वळ अपप्रचार आहे हे लक्षात घेतले पाहिजे.

केवळ अस्पृश्याना ' दलित ' म्हणण्यास बाबासाहेबांची असहमती.

बाबासाहेबानी राउंड टेबल कॉन्फरन्स मध्ये सहभागी झाल्यानंतर दिनांक 1 मे 1932 रोजी अल्पसंख्याक कमिटीस व मतदार कमिटीला दिलेल्या निवेदनात अस्पृशांचे दलित याऐवजी उचित असे अन्य नामाभिधान करावे अशी मागणी केली आहे. या निवेदनात बाबासाहेब डॉ. आंबेडकर म्हणतात- '' मतदार याद्यांचे आता जे पुनर्विलोकन करण्यात येणार आहे व प्रस्तावित राज्यघटनेत जे काही बदल प्रस्तावित आहेत ती संधी साधून "दलित वर्गाचे एक उचित आणि उपयुक्त नामकरण केले पाहिजे ' याची कारणमीमांसा करताना ते म्हणतात की, जनगणनेच्या वेळी दलित म्हणून जे अस्पृश्य नाहीत अशा अनेक जातींना दलित वर्गात समाविष्ट केले गेले आहे. यामुळे दलित या वर्गवारीवरून गोंधळाची स्थिती निर्माण झाली आहे.दुसरी महत्वाची बाब म्हणजे,दलित वर्ग म्हणजे खालचा आणि निराधार समूह आहे अशी भावना यातून निर्माण होते. जेव्हाकी, प्रत्येक प्रांतात त्यांच्यातही अनेक संपन्न आणि सुशिक्षित लोक आहेत.या संपूर्ण समुदायामध्ये आपल्या गरजा व अधिकार यासंदर्भात चेतना जागृत होत आहे. त्यांच्या मनामध्ये सन्मानजनक सामाजिक दर्जा प्राप्त करण्याची प्रबळ इच्छा निर्माण झाली आहे आणि ती प्राप्त करण्यासाठी ते जबरदस्त प्रयत्न शील आहेत. या सर्व बाबी पाहता दलित वर्ग ही संज्ञा अयोग्य आणि अनुचित वाटते. आसामचे जनगणना अधीक्षक मिस्टर मुल्लन यांनी अस्पृश्य जातींना उद्देशून बाह्य जाती ( ‘exterior castes’) हा शब्द वापरला आहे. जो अस्पृश्य जातींची हिंदू धर्मातील नेमकी अवस्था दर्शविणारा आहे. या शब्दाचे काही फायदे आहेत. या शब्दामुळे सामाजिक व शैक्षणिक मागासलेपण व हिंदू धर्मापासूनचे वेगळेपण या दोन्ही गोष्टी स्पष्ट होतात. तसेच जे अस्पृश्य नाहीत पण दलित वर्गात आहेत त्यांची नाराजी व गोंधळ दूर होतो. यामुळे जोपर्यंत अस्पृश्य जातींना उद्देशून एक उचित नामाभिधान सापडत नाहीत तो पर्यंत त्यांना दलित वर्ग या ऐवजी बाह्य जाती ( ‘Exterior Castes’) किंवा बहिष्कृत जाती ( Excluded Castes ) संबोधने उचित होईल.'' ( BAWS Vol-2, Page 499-500)डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी अस्पृश्याना ' दलित वर्ग ' ऐवजी दुसऱ्या कोणत्यातरी उचित नावाने संबोधण्याबाबत वरील निवेदनांशिवाय अन्य कोठेही आग्रह धरल्याचे किंवा दलित शब्दाला विरोध केल्याचे दिसत नाही.हे निवेदन दिल्यानंतरही त्यांनी पुढे अनेक वेळा दलित हा शब्द आपल्या भाषणांतून व लेखनात वारंवार वापरला आहे. हे पाहता डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची 'दलित ' हा शब्द केवळ अस्पृश्याना उद्देशून वापरण्यास प्रस्तुत निवेदनात असहमती दर्शविण्याची करणे तत्कालीन परिस्थितीच्या आधाराने शोधली पाहिजेत. यासंदर्भातील विश्लेषण या लेखाच्या दुसऱ्या भागात करण्यात येईल.

No comments:

Post a Comment