Saturday, July 23, 2016

‘आंबेडकर भवनासाठी सरकारी मदत नको’

‘आंबेडकर भवनासाठी सरकारी मदत नको’

म. टा. प्रतिनिधी, पुणे

'मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई येथील आंबेडकर भवन पुन्हा उभारण्यासाठी आवश्यक तो निधी देण्याची तयारी दर्शवली, याचे स्वागत आहे. मात्र, या निधीऐवजी श्रमदान आणि लोकवर्गणीतून हे भवन उभारले जाईल', असे जाहीर करून भारिप-बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी सरकारी मदत नाकारली.

आंबेडकर भवनाची पुनर्बांधणी करण्यासाठी प्रकाश आंबेडकर आणि आनंदराज आंबेडकर यांनी आराखडा दिल्यास सरकार सगळा निधी देण्यास तयार असल्याची घोषणा मुख्यमंत्री फडणवीस यांनी बुधवारी विधान परिषदेत केली. या पार्श्वभूमीवर खासदार आंबेडकर यांनी ही मदत नाकारत असल्याचे पत्रकार परिषदेत सांगितले. ते म्हणाले, 'आंबेडकर भवनासाठी लोकांच्या करातून जमा झालेला निधी वापरणे योग्य नाही. त्याऐवजी श्रमदान आणि लोक वर्गणीतून हे भवन उभारले जाईल. हे लोकांचे प्रेरणास्थान असल्याने सरकारने निधी द्यावा, अशी परिस्थिती येणार नाही. लोकांच्या सहभागातूनच हे भवन उभे राहील.' 'या प्रकरणात पोलिसांनी एफआरआय दाखल करण्यास दिरंगाई केली. त्यामुळे संबंधितांची चौकशी झाली पाहिजे. हे भवन रात्री दोन वाजता पाडण्यात आले. त्यासाठी पोलिस बंदोबस्त न घेता बाउन्सर वापरले गेले. बुलडोजरने वास्तू पाडण्यात आली. त्यामुळे संबंधितांवर कारवाई होणे अत्यावश्यक आहे. या प्रकरणात राज्य सरकारही धुतल्या तांदळासारखे नाही', असे आरोप आंबेडकर यांनी केले.

कोपर्डीला जाण्यास मनाई 'कोपर्डी येथील अल्पवयीन मुलीवर अत्याचार आणि खून प्रकरणानंतर संबंधित मुलीच्या कुटुंबीयांची भेट घेण्यासाठी जाणार होतो. मात्र, नगरच्या पोलिस अधीक्षकांनी या ठिकाणी जाण्यास मनाई असल्याचे सांगितले. या गावातील एका स्थानिक नेत्याने १२ जणांची बैठक घेऊन मी त्या ठिकाणी गेल्यावर कांदे, बटाटे, अंडी आणि टॉमेटो मारण्याची तयारी केली असल्याचीही माहिती देण्यात आली. त्यानंतर दंगल घडवून त्याचा लाभ घेण्याचा त्याचा प्रयत्न होता. 'त्या' नेत्याकडून राजकारण करण्यात येत आहे. त्याच्याविरूद्ध अनेक गुन्हे दाखल आहेत. पुढारपण करण्यासाठी त्याने ही तयारी केली होती. त्यामुळे कोपर्डी येथे न जाण्याचा निर्णय घेतला आहे. काही दिवसांनी संबंधित कुटुंबीयांना भेटणार आहे', असे आंबेडकर यांनी स्पष्ट केले. 'त्या' नेत्याचे नाव उघड करण्यास मात्र त्यांनी नकार दिला. 'साक्षीदार पुढे येऊ नयेत, यासाठी वातावरण तयार करण्यात येत आहे. भीतीचे वातावरण निर्माण करण्याचा हा प्रयत्न आहे', असा आरोपही आंबेडकर यांनी केला.

'शरद पवारांनी आवाहन करावे' 'राजकारण्यांवर आता कोणाचा विश्वास राहिलेला नाही. अशी माणसे थोडीच आहेत', असे सांगत आंबेडकर म्हणाले, 'कोपर्डी येथील प्रकरणाचे राजकारण करण्यात येऊ नये. या प्रकरणानंतर निर्माण झालेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी शांतता राखण्याचे आवाहन करावे.'


भाजपने अराजकता माजवू नये! अत्याचाराच्या घटना वाढत असताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी राज्यात गुन्ह्यांचे प्रमाण कमी झाले असल्याची माहिती दिली आहे. यावर आंबेडकर म्हणाले, 'मुख्यमंत्री फडणवीस यांनी त्यांच्या पक्षाच्या विचारधारेपासून दूर राहिले पाहिजे. गुजरात आणि उत्तर प्रदेशातील घटना पाहिल्यास भाजपकडून अराजकता माजवण्यात येत असल्याचे दिसते. भाजपने सत्ता करावी, अराजकता माजवू नये', असा सल्ला आंबेडकर यांनी दिला.
 




No comments:

Post a Comment