Wednesday, July 20, 2016

आंबेडकर भवन पाडण्यासंदर्भात मा.रत्नाकर गायकवाड यांना खुले पत्र –------------------------------------------ ( लेखक:बापू राऊत)

आंबेडकर भवन पाडण्यासंदर्भात 
मा.रत्नाकर गायकवाड यांना खुले पत्र
–------------------------------------------
( लेखक:बापू राऊत)
मा.गायकवाड साहेब, सविनय जयभीम
दै.लोकसत्ता मध्ये दिनांक १०.०७.२०१६ रोजी आपले मनोगत प्रकाशित झाले. काही न्यूज चॅनेल्स वर सुध्दा आपण आपली भूमिका स्पष्ट केली आहे. आपल्याकडून आंबेडकर भवन पाडण्यासंदर्भात आंबेडकरी समुहात अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. आपल्या लेखात ‘दलितांच्या सर्वांगीण विकासाठी एक मध्यवर्ती सामाजिक केंद्र निर्माण करण्यासाठी बाबासाहेबांनी इमारत फंड उभारण्यास सुरुवात केली होती आणि त्या उभारलेल्या पैशातूनच बाबासाहेबांनी १० आक्टोबर १९४४ साली गोकुळदास पास्ता यांच्याकडून २३३२ चौ.यार्डाचा भूखंड घेतला व २९ जुलै १९४४ साली शेड्युल्ड कास्ट इम्प्रूव्हमेंट ट्रस्टची स्थापना केली’ असे आपल्या लेखातून स्पष्ट होते.
आपल्या लेखाच्या बाजूलाच प्रकाश आंबेडकर यांचा लेख प्रकाशित झालेला आहे. त्यांच्या मतानुसार बाबासाहेबांनी १९४० साली दादर येथील गोकुळदास यांच्याकडून जागा विकत घेतली व त्याचे कन्व्हेयन्स डीडही केले. त्यासाठी बाबासाहेबांनी स्वत:च्या बॅक खात्यातून पैसे दिले. पैशाच्या चनचणीमुळे बाबासाहेब व भैय्यासाहेब आंबेडकर यांचा सहभाग असलेली सिमेंट फॅक्टरी विकून आंबेडकर भवन, राजगृह व रामगुंफा या घेतलेल्या जागांमध्ये गुंतवणूक केली. १९४४ साली याच विकत घेतलेल्या जागेत भारत भूषण प्रिंटिंग प्रेसची उभारणी करण्यात आली. मात्र आपल्या लेखानुसार बाबासाहेबांनी १० आक्टोबर १९४४ साली गोकुळदास यांच्या कडून जागा घेतली. जागेसंदर्भात आपल्या व बाळासाहेब आंबेडकर यांच्या लेखात विसंगती दिसून येत आहे. त्यामुळे आंबेडकर भवनाची जागा हा आता खोल संशोधनाचा विषय झालेला असून आपल्या भूमिकेबाबत समाजात प्रश्नचिन्ह व सांशकता निर्माण झाली आहे.
आपणच टीव्ही चॅनेलवर दिलेल्या माहितीनुसार, ट्रस्ट मध्ये तुम्ही प्रथम ट्रस्टी झालात व नंतर आपल्या एका नातेवाईकाला ट्रस्टचा सदस्य बनवून स्वत:च्या ट्रस्टशिप पदाचा राजीनामा दिला. ट्रस्ट मध्ये सल्लागार हे पद अस्तित्वात नसताना तुम्ही सल्लागार झालात. असे करण्यात तुमची कुटनीती व सुप्त असा स्वार्थ हेतू स्पष्टपणे दडलेला दिसतो. आपण म्हणालात, दुर्दव्याने बाबासाहेबांच्या कल्पनेतील वास्तू तयार झाली नाही. बाबासाहेबांच्या मनातील वास्तू कशी होती हे तुम्हास कसे कळले? याबाबत बाबासाहेबांनी तयार केलेली एखादी ब्ल्यू प्रिंट तुमच्याकडे उपलब्ध आहे काय? असेल तर ती आपण जाहीर करणार काय?
आपण म्हणता बाबासाहेब हे समाजाचे आहेत. बाबासाहेबांची प्रत्येक वास्तू ही समाजाची आहे तर त्या वास्तुसंदर्भात केवळ तुम्ही व ट्रस्टचे पाच लोकच कसा काय निर्णय घेवू शकता? समाजाने निर्णय घेण्याचा अधिकार तुम्ही का डावलला? आंबेडकर भवनाची इमारत पाडण्याअगोदर तुम्ही जनमत का घेतले नाही?. आपल्याला १७ मजली वास्तू बांधावयाची होती तर ती सरकार व बिल्डरच्या माध्यमातूनच बांधण्याचा परस्परच निर्णय का घेण्यात आला?. समाजातून जमा केलेल्या पैशातून कमी मजल्याचे आंबेडकर भवन बांधता आले नसते का? बरे, आंबेडकर भवन पाडायला ती तुमची स्वत:ची प्रापर्टी वाटली काय? ट्रस्ट हे फक्त असलेल्या वास्तूची देखभाल व तिची निगा राखण्यासाठी असते. असे असताना, महापुरुषाच्या ठेवा नष्ट करण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला?
आपल्या मतानुसार बाबासाहेब समाजाचे, त्यांची वास्तूही समाजाची मग आम्ही ही म्हणतो, रत्नाकर गायकवाड हे समाजाचे व त्यांनी घेतलेल्या वास्तूही समाजाच्या. तेव्हा तुमच्या वास्तू समाजाला कधी दान करणार आहात? हे समाजाला लवकर कळले तर बरे होईल.
‘माझे कुटुंबीय ट्रस्टवर येणार नाहीत’ असे बाबासाहेबांनी म्हटले आहे असे आपण म्हणता. त्यासाठी बाबासाहेबांच्या पत्राचा आपण वारंवार उल्लेख करताय. परंतु आपल्याला माहीत असेल की, बाबासाहेबानंतर भैय्यासाहेब आंबेडकर यांचे नेतृत्व आपल्या मानगुटीवर बसू नये म्हणून बाबासाहेबांच्या सहकारी नेत्यांनी भैय्यासाहेबांना व्यसनात गुंतविले आणि तेच लोक भैय्यासाहेबांच्या तक्रारी बाबासाहेबाकडे वारंवार करीत असत. त्यामुळेच रागावलेल्या बाबासाहेबांनी तसे म्हटले होते. बाबासाहेबांचा राग हा त्यांच्या मुलावर होता परंतु तो राग त्यांच्या नातवंडावर कसा काय असू शकतो? गायकवाड साहेब, तुम्ही तुमच्या मुलाचा राग स्वत:च्या नातवंडावर काढून त्यांना रस्त्यावर फेकून देवू शकाल काय?. कोणत्याही व्यक्तीकडून असे होवू शकत नाही. त्यामुळेच बाबासाहेबांच्या वंशजांना ट्रस्टमध्ये येवू न देण्याचा तुमचा तर्क हा तकलादू, स्वार्थी व अनाकलनीय वाटतो. दुसरी बाब म्हणजे, तुम्ही मूळ ट्रस्टीच्या गोतावळ्यात नाहीत तरीही तुम्हाला ट्रस्टचे सदस्यपद कसे काय मिळाले? स्वत:च्या सदस्यपदाचा राजीनामा देऊन आपल्या नातेवाईकांना सदस्य बनविता व सल्लागार पदाची तरतूद नसतानाही तुम्ही सल्लागारपदी विराजमान होता. हे सारे तुम्ही कोणत्या अधिकारात करताय? यासंदर्भात बाबासाहेबांनी तुमच्यासाठी काही विशेष सवलतीचे पत्र लिहून ठेवले आहे काय? तसे पत्र असल्यास ते जनतेसमोर उघड कराल काय? जुन्या ट्रस्टीनी नवे ट्रस्ट सदस्य बनविण्यासाठी माध्यमात जाहीरात का दिली नाही? समाजात ट्रस्टीपदासाठी तुमच्या शिवाय इमानदार, निस्वार्थी व निखळ आंबेडकरवादी लोकांची कमतरता आहे काय?. आपण याचा खुलासा करावयास हवा.
गायकवाड महोदय, जे आंबेडकर भवन पाडण्यात आले त्याचा चळवळीसी व हेरीटेजसी कसलाही सबंध नाही असे आपण ओरडून सांगत आहात. याला तर चक्क खोटारडेपणाचा कळसच म्हणता येईल. या भवनातून अनेक चळवळी व कार्यक्रम चालत होते. महार बटालियन ची निर्मिती, रिडल्स मोर्च्याची आखणी तर अलीकडील रोहित वेमुला परिवारांचे धर्मांतर याच भवनातून झाले. एवढेच नव्हे रोज होणाऱ्या लहान मोठ्या कार्यक्रमाचे ते केंद्रस्थान होते. सामान्यजणांचे ते एक आश्रयस्थान होते. बाबासाहेबांनी हात लावलेली व उभी केलेली प्रत्येक वास्तू ही समाजाची श्रध्दास्थाने आहेत. हे श्रद्धास्थान पाडताना तुमचा हात एकदाही थरथरला नाही काय? भवन पाडण्याचा आदेश देताना तुमची जीभ थोडीही अडखळली नाही काय? आम्हास वाटते, आंबेडकर भवन पाडून तुम्ही अघोरी कृत्य केले. त्यासाठी आपण कोणते प्रायश्चित घेणार आहात हे समाजास कळले पाहिजे.
लेखात आपण कार्यक्रमांची खूप मोठी यादी दिली आहे व असे केल्यास बाबासाहेबांचे स्वप्न साकार होईल असे म्हटले आहे. वास्तविकता मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद अशा इतर अनेक ठिकाणी ध्येयाने प्रेरित झालेले आंबेडकरवादी मोठमोठ्या इमारती बांधून बाबासाहेबांच्या स्वप्नपूर्तीसाठी अहोरात्र झटून कार्य करीत आहेत. त्यासाठी त्यांना कोणत्याही वास्तूची नासधूस करावी लागली नाही. आपल्याकडून कोणती विशेष स्वप्नपूर्ती होणार आहे? आपण बाबासाहेबांच्या स्वप्नातील राजकीय व धम्मक्रांती करणार आहात काय?. त्यासाठी आपण कोणत्या राजकीय पक्षात वा संस्थामध्ये जाणार आहात की स्वत:चा एक गट निर्माण करणार आहात? कोणता जनसमूह आपल्या पाठीशी आहे?
गायकवाड साहेब, आपल्या मतानुसार बाबासाहेबांची प्रत्येक प्रापर्टी ही समाजाची आहे. याच न्यायाने आंबेडकर भवन वर कब्जा करून प्रकाश आंबेडकर राहत असलेले राजगृह खाली करण्यास सांगत आहात. यातून आपल्या हिणकस व बेमुर्वतपनाच्या वृत्तीचे दर्शन झाले. महापुरुषांनी समाजासाठी आपले संसार उघडे पाडायचे. आपल्या कुटुंबाची वाताहत लावायची आणि परत ज्या समाजाच्या फायद्यासाठी ते अहोरात्र झटले त्या समाजानेच त्यांच्या कुटुंबावर लाथ उगारायाची असा प्रकार दिसतो. महात्मा ज्योतिबा फुल्यांचे वंशज रस्त्यावर भीक मागायचे व दारोदारी जावून काम मागायचे तेव्हा हा समाज कुठे होता? अण्णाभाऊ साठे यांच्या कुटुंबावर बेकारीचे कुर्हाड कोसळले तेव्हा समाज त्यांच्या मदतीला का धावला नाही? महापुरुषांच्या कुटुंबाना या समाजाने काय दिले? समाज काय केवळ फुकटचा मलिंदा खाण्यासाठी असतो काय? समाजाचीही काही जवाबदेही असते की नाही? गायकवाडजी, आज तुम्ही जे काही आहात ते बाबासाहेब यांच्या कष्टाची देन आहात. परंतु तुम्ही बाबासाहेबांना काय दिले? तुम्ही तर बाबासाहेबांचा प्रिंटिंग प्रेस व त्यांच्या स्पर्शाने चळवळीचे केंद्र बनलेले आंबेडकर भवन बुलडोझरनी उध्वस्थ करून टाकलात. बाबासाहेबांच्या कुटुंबियांना गुंड म्हणता, राजगृह या त्यांच्या राहत्या घरातून हाकलून देण्याची भाषा करता. कसले तुम्ही आंबेडकरवादी व विपश्यनावादी? कोण म्हणतय तुम्हाला आंबेडकरवादी? आंबेडकरवादाचा बुरखा घालून आंबेडकरी चळवळीला नष्ट करायला निघालेल्या कळपातील आपण एक प्यादे तर नाही ना! आम्ही तर ऐकले होते की, विपश्यना केलेले लोक हे शांत, संयमी व मृदू स्वभावाचे असतात परंतु अनुभव तर फार वेगळाच येतो आहे.
आपणास एक सांगावेसे वाटते, आजपर्यंत कोणत्याही चळवळी व आंदोलने ही टावर मधून जन्माला आल्या नाहीत. त्या झोपडपट्टीतून जन्माला आल्या व वादळासारख्या घोंगावत नव्या क्रांतीकडे झेपावल्या. टॉवर मधून व्यवस्थेवर हाथोडा मारणारी पिढी तयार होत नाही तर जैसे थे वाद्यांची पिढी जन्म घेत असते. विकसित लोक अविकसीताना नेहमीच मागे ढकलत असतात. अशा आजच्या करोडो अविकसित लोकांचे मार्गदर्शक “बाबासाहेब” बनू पाहत आहेत. आज आपल्यात बाबासाहेब नाहीत, परंतु अविकसितांच्या मार्गदर्शनासाठी त्यांनी निर्माण केलेली केंद्रे शाबूत असली पाहिजेत. या केंद्रातूनच उद्याच्या क्रांतीचा, परिवर्तनाचा व नव्या व्यवस्थेचा एल्गार सुरु होईल. त्यासाठीच आंबेडकर भवन व तेथील स्मुर्त्या जपल्या पाहिजेत. बाबासाहेबांचा बुद्धभूषण प्रिंटिंग प्रेस नव्या पिढीत मिडिया तंत्रात भरारी मारण्यासाठी उत्तेजना व जोश भरेल. त्यासाठीच त्याला जपले पाहिजेत. बाबासाहेबांनी निर्माण केलेल्या संस्था व वास्तूमध्ये त्यांच्या कुटुंबाचा हिस्सा नाकारणे हा फार मोठा बेदरकारपणा ठरतो. म्हणून, बाबासाहेबांच्या स्वप्नपूर्तीसाठी आपण नव्या संस्था निर्माण करून नव्या जागेत नव्या वास्तू उभारून बाबासाहेबांच्या कुटुंबाना न्याय देता येवू शकतो.
गायकवाड साहेब, बाबासाहेबांचा विचार आपल्या पाठीशी आहे. त्या विचारावर आपल्याला मार्गक्रमण करून नवे परिवर्तन घडवायचे आहे. मागचा अनुभव घेवून उद्याच्या पिढीचा भविष्यकाळ निश्चित करावयाचा आहे. आपल्याला नष्ट करण्यासाठी अनेक शत्रू टपून बसलेले आहेत. आपण आपसातच भांडत राहावे हा नेहमीच त्यांचा मुख्य हेतू असतो. कारण आपल्या भांडनातच त्यांचा विकास दडलेला आहे. हजारो वर्षापासून त्यांचे सत्ताधारी म्हणून यशस्वी होण्याचे गमक आपल्या भांडणात आहे. याचा आपण कधी विचार करणार आहोत? म्हणूनच आपल्याला एक आंबेडकरवादी म्हणून आवाहन करू इच्छितो की, चला, सारे सामोपचाराने मिटवू या, मतभेद जमिनीत गाडू या आणि नव्या उषा:कालाकडे झेप घेवू या.
बापू राऊत , मुंबई
९२२४३४३४६४

No comments:

Post a Comment