Tuesday, July 12, 2016

रमाबाई आंबेडकर नगर हत्याकांड:आजच्याच दिवशी 19 वर्ष पूर्वी भयानक हत्याकांड घडले होते.👇�

आजच्याच दिवशी 19 वर्ष पूर्वी भयानक हत्याकांड घडले होते.👇
श्रीकांत खरात
रमाबाई आंबेडकर नगर, घाटकोपर येथे ११ जुलै १९९७ रोजी पहाटे बाबासाहेबांच्या पुतळ्याची विटंबना करण्यात आली. पुतळा भर चौकातच होता. त्याच्या अगदी २० फुट मागे पोलीस चौकी. चौकीमध्ये पोलीस पहाऱ्यासाठी हजार असताना कोणी विटंबना केली हे पोलिसांनी पहिले नाही. हि बातमी संपूर्ण रमाबाई नगरात पसरली. लोक पुतळ्याभोवती जमाव करू लागले. लोकांमध्ये दुखः, चीड, आक्रोश या भावनांचा उद्रेक होणे साहजिक होते. पोलीस अधिकारी हि घटना स्थळी हजर होते. डॉग स्कॉट मागवा, विटंबना करणाऱ्याला ताबडतोब अटक करा. अशा मागण्या येऊ लागल्या. पुतळ्या समोरील हायवे वर लोक पुतळा विटंबना निषेधार्थ रस्त्यावरच ठाण मांडून बसले. वाहतूक ठप्प झाली. सगळीकडे घोषणा, निषेध, गोंगाट इतक्यात गोळीबाराचा आवाज झाला. सारे शांत झाले. निमलष्करी सशस्त्र जवान खाडखाड बूट वाजवीत आले. त्यांनी पुतळ्याला घेराव घातला. एका पोलीस अधिकाऱ्याने काठीने पुतळ्याच्या गळ्यातील चपलांचा हार काढला. त्यानंतर रमाबाई आंबेडकर नगर वस्तीत एकच आकांत झाला. फौजदार मनोहर कदमच्या आदेशावरून आंदोलनकर्त्यांवर अचानक गोळीबार करण्यात आला. दहा जणांचे मुडदे जगाच्या जागी पाढण्यात आले. अनेक जन जखमी झाले होते. वस्तीतील जनतेला मोठा धक्का बसला होता. रमाबाई नगरची सारी वस्ती रक्ताने माखली होती. या हत्याकांडाने उभ्या महाराष्ट्रात असंतोषाचा आगडोंब उफाळून बाहेर आला. दलितांच्या इतक्या अमानुष हत्याकांडानंतर शिवसेनाप्रमुख बाळ ठाकरे यांनी फौजदार मनोहर कदमची जाहीर प्रशंसा केली. युती शासनाने या हत्याकांडाचे सारे पुरावे नष्ट करण्याची सुरुवात केली. ज्या कार्यकर्त्यांनी वस्तीमध्ये बाबासाहेबांचा पुतळा स्थापन केला त्यांनाच पुतळा विटंबनेच्या गुन्ह्यात आरोपी केले गेले. त्यांच्यावर दंगल केल्याचे आरोप दाखल केले गेले. गोळीबारात जे वाचले त्यांच्यावरच पोलिसांवर हल्ला केल्याच्या केसेस दाखल केल्या गेल्या. युती शासनाने मुंबईतील एका लढाऊ वस्तीला अद्दल घडवण्यासाठी पाताळयंत्रीपणाचे सारे प्रयोग केले. पण आंबेडकरी जनतेने या अत्याचाराचा, दडपशाहीचा प्रतिकार करण्याचे ठरवले. त्यावेळी मा. श्यामदादा गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली "रमाबाई आंबेडकर नगर हत्याकांड विरोधी संघर्ष समिती" स्थापन करण्यात आली. सरकारने जनरेट्यामुळे "गुंडेवार चौकशी आयोग" नेमला. एकीकडे न्यायालयीन लढा तर रस्त्यावर न्यायासाठी आंदोलने सुरु झाली. "जोशी मुंडे दोनो गुंडे", "जातीयवादी शासन चले जाओ", "जयभीम के नाम पे खून बाहे तो बहाणे दो" अशा घोषणांनी सारे महानगर दणाणून गेले. निष्क्रिय नेत्यांना वस्तीमध्ये जनतेने मजबूत चोप दिला. गुंडेवार आयोगाचा अहवाल विधानपटलावर आणण्यासाठी पुन्हा न्यायालयीन लढाई झाली. अहवाल पटलावर आला. प्रसिद्ध झाला. न्या. गुंदेवरांनी हा गोळीबार निशस्त्र व शांत जनतेवर केला असा अभिप्राय दिला. आंबेडकरी जनतेने आंदोलनात सातत्य ठेवले. नंतर आघाडी सरकार आले. त्यांनी मनोहर कदम वर भा.द.वी. ३०२ ऐवजी ३०४ हे कलम लाऊन तब्बल ८ वर्षांनी फिर्याद नोंदवली. कार्यकर्त्यांवरील केसेसच्या सुनावण्या सुरु झाल्या. या प्रकरणाचा पाठपुरावा करणाऱ्या रमाबाई आंबेडकर नगर हत्याकांड विरोधी संघर्ष समिती चा इतिहास संपूर्ण महाराष्ट्राने पाहिला आहे. श्यामदादा गायकवाड व त्यांच्या सोबत असणाऱ्या कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम केले. त्याला तोड नाही. फौजदार मनोहर कदमला जन्मठेप झाली. पण तो आज जामिनावर मुक्त आहे. त्याचे अपील मुंबई उच्च न्यायालयात प्रलंबित आहे. "रमाबाई आंबेडकर नगर हत्याकांड विरोधी संघर्ष समिती"च्या लढ्याने कार्यकर्ते खोट्या केसेस मधून ते निर्दोष सुटले. विटंबनेच्या आरोपातून व दंगलीच्या आरोपातून कार्यकर्ते निरपराध शाबित झाले असले तरी अजूनही रमाबाई आंबेडकर नगरची लढाई संपलेली नाही.........
रमाबाई आंबेडकर नगरच्या सर्व शूर शहिदांना क्रांतिकारी अभिवादन...
अमर रहे,,, अमर रहे,,, घाटकोपर के शहीद अमर रहे..!
जय भीम...!!!

No comments:

Post a Comment