Tuesday, May 3, 2016

सामाजिक माध्यमाच्या जमान्यात अभिव्यक्त होण्याची सोपी साधने उपलब्ध झाल्यामुळे लागू/गैरलागू मुद्यावर आपली क्रिएटिव्ह उर्जा व्यर्थ घालविण्यात तरुणाई गुंतली आहे हे पाहून चिंता वाटते.

Sunil Khobragade
कोणत्याही विषयावर नुसती वायफळ बडबड करीत राहणे,बोलत राहणे,निष्फळ चर्चा करीत राहणे हा स्वतःला आंबेडकरवादी म्हणवून घेणाऱ्या लोकांचा/युवकांचा स्वभाव बनला आहे. सामाजिक माध्यमाच्या जमान्यात अभिव्यक्त होण्याची सोपी साधने उपलब्ध झाल्यामुळे लागू/गैरलागू मुद्यावर आपली क्रिएटिव्ह उर्जा व्यर्थ घालविण्यात तरुणाई गुंतली आहे हे पाहून चिंता वाटते. वायफळ बडबड करीत राहणे,बोलत राहणे,निष्फळ चर्चा करीत राहणे हे आरोग्यवान असल्याचे लक्षण नाही.ती मनोरुग्णावस्था आहे. जो न थांबता,न थकता,काम,आराम,झोप विसरून नुसताच बोलत राहतो,निष्फळ मुद्दे मांडत राहतो तो व्यक्ती मनोरुग्ण समजला जातो. दोन किंवा अधिक व्यक्ती नुसतीच एकमेकांशी बोलत राहतात,एक थांबला की दुसरा बोलतो, दुसरा थांबला की पहिला बोलतो.दुसरा पहिल्याचे बोलणे थांबण्याची वाट पाहत असतो, पहिला दुसर्याच्या बोलणे थांबण्याची वाट पाहत असतो.यात कोणीही कोणाचे म्हणणे समजून घेत नसतो तर आपल्याला बोलण्याची संधी मिळण्याची वाट पाहत असतो. शांतचित्ताने एखाद्याचे म्हणणे ऐकून/समजून घ्यायला कोणीही तयार नाही.आम्ही फक्त वायफळ चर्चा करणारे लोक बनत चाललो आहोत.ऐकून घेण्याची आमची मानसिकताच नाही.यातून चर्चा वाद-विवाद सुरु राहतात, परंतु संवाद साधला जात नाही. संवाद साधला न गेल्यामुळे एकमेकात मैत्रीभाव निर्माण होत नाही.मैत्रीभाव जागृत न झाल्यामुळे सामुहिक प्रयत्न करून दु:ख दूर करण्याचे प्रयत्न होत नाहीत. दु:ख दूर करण्याचे सामुहिक प्रयत्न होत नसल्यामुळे माणसे कुढत,चरफडत,एकमेकांना दुषणे देत,एकमेकांवर चिडचिड करीत व्यर्थ बडबड करीत राहतात. फेसबुक,व्हाट्सएप यासारख्या सामाजिक माध्यमातून सद्या सैराट चित्रपट,जातीवाद,मार्क्सवाद-आंबेडकरवाद,कन्हैय्याकुमार, आंबेडकरवादी राजकारण यासारख्या मुद्यावर जे काही वादविवाद सुरु आहेत ते आमच्या मनोरुग्ण अवस्थेचे लक्षण आहे असे माझे मत आहे.

No comments:

Post a Comment